या अभिनेत्रीने कार विकून घेतलीय रिक्षा, रिक्षा चालवत जाते सगळीकडे, हे आहे कारण

चित्रपट अथवा मालिकेतील कलाकार म्हटले की, ते आपल्या आलिशान कारने प्रवास करतात. पण तुम्हाला माहीत आहे का एका अभिनेत्रीने काही महिन्यांपूर्वी आपली आलिशान कार विकून चक्क रिक्षा घेतली आणि आता ती स्वतः रिक्षा चालवत सेटवर जाते. तिने कार विकून रिक्षा घेण्यामागे एक खास कारण आहे.

यशश्री मसुरकर या अभिनेत्रीने रंग बदलती ओढणी, चंद्रगुप्त मौर्य अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. गाडी विकून तिने रिक्षा का घेतली याविषयी तिने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. तिने म्हटले होते की, रिक्षा घेतल्यापासून माझे पैसे आणि वेळ या दोन्ही गोष्टी वाचतात.

माझ्याकडे कार होती. पण मला कार चालवता येत नव्हती. म्हणून मला ड्रायव्हरवर विसंबून राहावे लागत असे. त्यामुळे मी कार विकून रिक्षा घेतली आणि रिक्षा चालवत मीच सगळीकडे जायला लागले. सुरुवातीला मी रिक्षा चालवत असताना लोक माझ्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहायचे. पण आता मला याची सवय झाली आहे.

मुळात यशश्रीला ही कल्पना तिच्या एका मित्रामुळे सुचली. तिचा परदेशी मित्र डेन्मार्कवरून थेट मुंबईला सायकलवरून आला होता. डेन्मार्क ते मुंबई प्रवासासाठी त्याला 1 वर्ष 6 महीने इतका कालावधी लागला होता. त्याची कहाणी तिला इतकी प्रेरणादायी वाटली की, तिने रिक्षाने मुंबई ते आग्रा असा प्रवास केला.

यशश्री 10 वर्षापासून अभिनयक्षेत्रात काम करत आहे. मात्र चांगल्या कामाच्या शोधात असणारी यशाश्री सध्या रेडीओ जॉकी म्हणून काम करत आहे. रेडीयो जॉकी म्हणून काम करण्यातही एक वेगळीच मजा येत असल्याचे तिने म्हटले आहे.

एवढेच नव्हे तर यशश्री अनेकवेळा गरजू मुलांना तिच्या रिक्षामधून लिफ्ट देखील देते. तिने सुरुवातीला रिक्षा चालवायला सुरुवात केली, त्यावेळी तिच्याच मित्रमैत्रिणींनी तिची टर उडवली होती. पण आता सगळ्यांनाच तिला या रूपात पाहायची सवय झाली आहे.