‘शितली’ची काकी पुन्हा चर्चेत, बोल्ड लूक सोशल मीडियावर व्हायरल

सध्या मराठी मालिकाविश्वात बऱ्याच नव्या मालिकांची भर झाली आहे. या नव्या मालिकांमध्ये अनेक जुने चेहरे प्रेक्षकांना नव्या अंदाजात पाहायला मिळत आहेत. त्यातच चर्चा आहे ‘पाहिले न मी तुला’ या नव्या मालिकेची. या मालिकेत अभिनेता शशांक केतकर पहिल्यांदाच नकारात्मक भूमिका साकारतोय. यातल्या आणखी एका अभिनेत्रीची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.

मालिकेत नीलमची भूमिका साकारणारी अभिनेत्री मंजुषा खेत्री एका वेगळ्याच अंदाजात प्रेक्षकांसमोर आली आहे. मंजुषाने ‘लागीरं झालं जी’ या लोकप्रिय मालिकेत शीतलीच्या काकीची भूमिका साकारली होती. कलाकार मालिकेतील असो किंवा मग चित्रपटातील, प्रेक्षकांची मनं जिंकली असतील तर त्या कलाकाराचा सोशल मीडिया प्रोफाइल चाहत्यांकडून नक्कीच फॉलो केला जातो.

याचमुळे सध्या मंजुषाच्या फॉलोअर्सची संख्या वाढत असून तिचे सोशल मीडियावरील विविध फोटोसुद्धा व्हायरल होत आहेत. यातील काही फोटोंमधील तिचा बोल्ड आणि बिनधास्त अंदाज चाहत्यांना, नेटकऱ्यांना भावला आहे. मंजुषाने अनेक सौंदर्यस्पर्धांमध्ये भाग घेत करिअरची सुरुवात केली.

अशी होती मंजुषाची सुरुवात!

मंजुषाने ब्युटी काँटेस्ट पासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यामध्ये कोकण विभागातील अनेक स्पर्धेत विजेती ठरली होती. ‘मिस पश्चिम टाईम्स’, ‘मिस रत्नागिरी’, ‘मिस कोंकण’, ‘मिस साऊथ महाराष्ट्र’ अशा अनेक स्पर्धेत आपल्या सौंदर्याची छाप पाडत मंजुषा विजेती ठरली होती. यातूनच पुढे येत तिने आता अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे.

मंजुषाचा जन्म रत्नागिरी येथे झाला असून, ती गेल्या 10 वर्षापासून कोल्हापूर येथेच राहते. मंजुषा ही सोशल मीडियावर अगोदरपासूनच खूप सक्रिय असल्याची दिसून येते. सध्या तिच्या ट्रान्स्फरमेशन बोल्ड लूकची चर्चा सोशल मीडियावर नेहमीच होताना दिसून येते आहे. सध्या ‘पाहिले न मी तुला’ मालिकेत तिने साकारलेली ‘नीलम’ समरला तिच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे.