मोक्कार संपत्ती सोडून गेले राकेश झुनझुनवाला कुटुंबासाठी, विमान,पैसा गाडी…

ज्यांच्या युक्तीने आणि सुज्ञपणाने करोडो लोकांना शेअर मार्केटचं गणित समजलं, ज्यांच्या हुशारीपुढे करोडपती लोक लीन झाले, ज्यांच्या ज्ञानाच्या स्पर्शाने अनेकांच्या आयुष्याचं सोनं झालं, अशा शेअर बाजारातील बिग बुल म्हणून ओळखले जाणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांचं आज पहाटे निधन झालंय. वयाच्या ६२ व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही वर्षांपासून किडनीच्या आजाराने ते त्रस्त होते. साधारण दोन आठवड्यांपूर्वी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता.

पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे आज पहाटे त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र प्राथमिक माहितीनुसार झुनझुनवाला उपचारांना प्रतिसाद देत नव्हते. पुढच्या काही क्षणांत त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाची माहिती ब्रीच कँन्डी हॉस्पिटलचे डॉक्टरांनी माधमांना दिली.

राकेश झुनझुनवाला देशातील सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक होते. शेअर बाजारात लाखो लोकांनी त्याचा पोर्टफोलिओ फॉलो केला. झुनझुनवाला यांची भारताचे वॉरेन बफे म्हणूनही ओळख होती. शेअर बाजारातून पैसे कमावल्यानंतर त्यांनी एअरलाइन क्षेत्रातही प्रवेश केला होता. त्यांनी अकासा एअर या नवीन विमान कंपनीत मोठी गुंतवणूक केली होती आणि ७ ऑगस्टपासून कंपनीचं कामही सुरु झालं होतं.

झुनझुनवालांची संपत्ती किती?

शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या झुनझुनवाला यांच्या नावावर आज हजारो कोटींची संपत्ती आहे. इकोनॉमिक्स टाइम्सच्या वृत्तानुसार, त्यांच्या नावावर ४० हजार कोटी रुपयांची संपत्ती आहे. दरम्यान, उलथापालथ झालेली असतानाही झुनझुनवाला आणि त्यांची पत्नीजवळ २६ जुलैपर्यंत २७,३०० कोटी रुपयांचे शेयर्स होते. ३० जून २०२२ पर्यंत या दोघांची ३० पेक्षा जास्त कंपन्यांमध्ये भागीदारी होती. तर २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत शेवटी त्यांची संख्या ३५ होती.

फक्त ५ हजारांपासून सुरु केला व्यवसाय…

विशेष म्हणजे हजारो कोटींची संपत्ती असलेल्या झुनझुनवाला यांचा व्यवसायिक यशोगाथेचा प्रवास केवळ ५ हजार रुपयांपासून सुरु झाला. गोष्ट आहे १९८५ सालची… तेव्हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) सेन्सेक्स १५० अंकांच्या जवळ होता. त्या काळात लोकांना शेअर बाजाराबद्दल फार कमी माहिती होती. बाजार हा एक सट्टा आहे, असा सर्वसामान्यांचा समज होता. बाजार आजच्याप्रमाणे नियंत्रित नव्हता. गुंतवणुकीचे पर्याय खूप मर्यादित होते. लोक फक्त बँक एफडीवर विश्वास ठेवायचे. त्यावेळी राकेश झुनझुनवाला यांची दलाल स्ट्रीटमध्ये एन्ट्री झाली. गुंतवणुकीसाठी त्यांच्या हातात ५ हजार रुपयांचे भांडवल होते. तेवढ्याच पैशांवर त्यांनी पुढे हजारो कोटी रुपये जमावले.

शेअर बाजार झुनझुनवालांच्या हालचालींवर लक्ष ठेऊन असायचा

राकेश झुनझुनवाला हे नाव कायमच चर्चेत असायचं. शेअर बाजार त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून असायचा. सर्व विश्लेषक त्यांची रणनीती समजून घेण्याचा प्रयत्न करत. एप्रिल-जूनमध्ये बाजारात बरीच अस्थिरता होती. तेव्हा राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओमध्ये कमी-अधिक प्रमाणात कोणताही बदल झालेला दिसला नाही. सामान्य लोकांचे लाखो रुपये बुडाले तिथे झुनझुनवाला यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही.

राकेश झुनझुनवाला यांच्या प्रत्येक हालचालीवर बाजार नजर ठेवून असते, यामागे कारण देखील तसेच आहे. ते ज्या ठिकाणी गुंतवणूक करतील तिथे खेळ पालटतो. नेहमीच आक्रमकता योग्य नसते, हे देखील त्यांनी त्यांच्या उदाहरणातून पटवून दिलं. प्रत्येक गुंतवणूकदाराचे स्वतःचे ध्येय, उद्दीष्ट असते. हे उद्दीष्ट साध्य करण्याची कालमर्यादा देखील वेगवेगळी असते आणि जोखीम उचलण्याच्या क्षमतेतही फरक असतो. त्यामुळे या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आणि यांचा योग्य तो अभ्यास करून गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा, असा मेसेज ते गुंतवणूकदारांना नेहमी देत.