2 वर्षांपूर्वी सापडलं नाही ते आता सापडलं; मुलीचा मेडिकल रिपोर्ट पाहून कुटुंबाला बसला शॉक

10 वर्षांची नायरा शहा (नाव बदललेलं) काही दिवसांपूर्वी तिला वारंवार खोकला येऊ लागला. तिची प्रकृती पाहून कुटुंबानं तिला रुग्णालयात दाखल केलं. तिची तपासणी करण्यात आली. तेव्हा तिच्या फुफ्फुसांमध्ये काहीतरी असल्याचं डॉक्टरांना दिसलं.

विशेष म्हणजे डॉक्टरांनी तिच्या कुटुंबाला याची माहिती देताच त्यांनाही धक्का बसला. कारण त्यांनी दोन वर्षांपूर्वी रिपोर्ट काढला तेव्हा ज्याचा शोध त्यांनी घेतला तेव्हा त्यांना जे सापडलं नाही आणि ते आता सापडलं.

नायराने दोन वर्षांपूर्वी खेळताना अचानक एक धातूचा पिन गिळला. कुटुंबियांना हे कळल्यावर त्यांनी तातडीने मुलीच्या पोटाचा एक्स-रे काढला. या वैद्यकीय चाचणीतून काहीही आढळून आलं नाही. चाचणी अहवालात काहीच दिसून न आल्याने सर्वजण चिंतामुक्त झाले. कालांतराने ही घटना विसरून सुद्धा गेले.

झेन मल्टीस्पेशालिटी रुग्णालयातील कान-नाक-घसा शल्यचिकित्सक डॉ. क्षितीज शाह म्हणाले की, “या मुलीच्या छातीचा एक्स-रे काढला असता तिच्या छातीच्या डाव्या बाजूला खाली वायूमार्गाच्या भागात पिन आढळून आला आहे. हा पिन शोधण्यासाठी छातीचा सीटीस्कॅन काढण्यात आला.

मात्र या घटनेच्या दीड वर्षानंतर मुलीला वारंवार खोकल्याचा त्रास जाणवू लागला. मुलीची प्रकृती पाहून कुटुंबियांनी तिला चेंबूरमधील झेन मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात दाखल केलं. तिथं तपासणीत तो पिन तिच्या छातीत असल्याचं आढळलं. तिच्या फुफ्फुसात हा पिन अडकला होता.

त्यानंतर ब्रॉन्कोस्कोपीद्वारे फुफ्फुसात अडकलेला हा पिन बाहेर काढण्यात आला”कान-नाक-घसा शल्यचिकित्सक डॉ. शलाका दिघे म्हणाल्या की, “श्वसनमार्गात अडकलेली बाहेरील वस्तू काढून टाकण्यासाठी ब्रॉन्कोस्कोपी केली जाते.

भूल देऊन ही प्रक्रिया करावी लागते. ब्रॉन्कोस्कोपी वापरून फुफ्फुसातील वायुमार्गापर्य़ंत प्रवेश मिळवण्याची ही प्रक्रिया आहे. साधारणतः एक तास ही शस्त्रक्रिया सुरू होती. या शस्त्रक्रियेनंतर अवघ्या तासाभरात मुलाच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली.”उपचारानंतर मुलीच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने 48 तासांत तिला घरी सोडण्यात आले आहे.