धक्कादायक! मराठी चित्रपटसृष्टीतील या ज्येष्ठ अभिनेत्री आज आहेत अंथरुणाला खिळून

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांनी चित्रपट आणि नाटकमधील अभिनय आणि लावणीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. सध्या त्या आजारपणामुळे चित्रपटसृष्टीपासून दुरावल्या आहेत. त्यांच्या आजारपणामुळे त्या अंथरुणाला खिळल्या आहेत.

मधू कांबीकर यांचा जन्म २८ जुलै १९५३ रोजी कांबी या गावी झाला. त्यांचे वडील हे नाटकातील जाणते कलाकार असल्यामुळे अभिनयाचे बाळकडू त्यांना वडीलांकडून मिळाले. त्यांनी नाटकात काम करण्यास सुरुवात केली. कलाक्षेत्रात अपार मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी अनपेक्षित यश संपादन केले.

एवढेच नाही तर लावणीच्या चाहत्यांना लावणीचा इतिहास समजावा यासाठी त्यांनी लावणी संदर्भातील जेवढे लिखित साहित्य आहे ते जमवून तमाशाचा इतिहास गुंफण्याचे कार्य घडवून आणले. यात त्यांच्या फडातील ११ कलाकारांनी मोठी मदत केली. यावर आधारीत सखी माझी लावणी हा कार्यक्रम त्यांनी सादर केला. पुण्यातील बाळासाहेब भोसले यांच्याकडून त्यांनी कथ्थकचे प्रशिक्षण घेतले. पुण्यातच त्यांची कला फुलली आणि रुजली. अस्सल लावणी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा हा प्रयत्न निश्चितच फळाला आला.

१९८२ साली प्रदर्शित झालेल्या शापित चित्रपटातील त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्यानंतर त्यांनी एक होता विदूषक, झपाटलेला, डेबू, यशवंत, बिनकामाचा नवरा, येऊ का घरात, मला घेऊन चला, माझा छकुला अशा बऱ्याच चित्रपटात काम केले.

पुण्याची मराठी रंगभूमी आणि गोपीनाथ सावरकर प्रतिष्ठान यांनी २७ नोव्हेंबर २०१६ रोजी माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरमध्ये आयोजित केलेल्या ‘लावण्य संगीत’ या कार्यक्रमात नृत्य सादर करत असताना मधू कांबीकर यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. तरीही त्यांनी त्या कार्यक्रमात भैरवीचे सादरीकरण केले. त्यानंतर मेकअप रूममध्ये गेल्यानंतर त्यांना अर्धांगवायूचा सौम्य झटका आला त्यात त्यांचा उजवा हात बधीर झाला. या कार्यक्रमात त्या तब्बल १२ वर्षांनंतर नृत्य सादर करणार होत्या. १२ वर्षांपूर्वी अशाच प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी नृत्य न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतरही त्यांनी आपली ही कला मंचावर सादर केली होती. याच आजारपणामुळे आज त्या अंथरुणाला खिळून आहेत.