‘कूली’च्या सेटवर झालेल्या दुर्घटनेनंतर मला आजपर्यंत…; बिग बींनी केला KBC मध्ये खुलासा

माहिताचा स्त्रोत म्हणून पाहिला जाणारा छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती.’ बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन या शोचे सूत्रसंचालन करताना दिसतात. शोमध्ये हॉटसीटवर बसलेल्या स्पर्धकांशी बिग बी गप्पा मारत मजेशीर किस्से सांगताना दिसतात.

बऱ्याच वेळा ते त्यांच्या खासगी आयुष्याविषयी बोलताना दिसतात. सोमवारी पार पडलेल्या एपिसोडमध्ये बिग बींनी हॉटसीवर बसलेल्या स्पर्धकाशी गप्पा मराताना त्यांच्या आयुष्यातीला एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. त्यांनी ‘कूली’ चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी घडलेल्या घटनेनंतर त्याचा त्यांच्या आयुष्यावर परिणाम झाल्याचे सांगितले.

हॉटसीटवर बसलेले सरबजीत सिंह हे बिग बींशी गप्पा मारत होते. दरम्यान त्यांनी कूली चित्रपटातील किस्सा सांगितला. सेटवर दुखापत झाल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. त्यानंतर बिग बी मुंबईत आले आणि त्यांनी पुढील उपचार घेतले. अनेक सर्जरी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे बिग बींना प्रचंड त्रास सहन करावा लागला होता.

‘कूली चित्रपटाच्या सेटवर घडलेल्या दुर्घटनेनंतर मला आजपर्यंत उजव्या हाताची नस जाणवत नाही’ असे अमिताभ यांनी म्हटले आहे. जुलै १९८२ मध्ये चित्रपटातील एक साहसदृष्य करताना अमिताभ यांना दुखापत झाली होती. दृष्याचे चित्रीकरण करताना बिग बींच्या पोटात टेबलाचा कोपरा लागला आणि गंभीर जखम झाली होती.

एका रुग्णालयात त्यांना ताबडतोब दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांची प्रकृती खूप नाजूक होती असं म्हटलं जातं. अमिताभ बच्चन वाचतील की नाही असा प्रश्नच निर्माण झाला होता. मात्र २ ऑगस्ट रोजी डॉक्टरांनी एड्रेनलाइन इंजेक्शन थेट त्यांच्या हृदयात लावली. नंतर प्रकृती सुधारल्यानंतर १९८३ साली त्यांनी पुन्हा ‘कुली’च्या चित्रीकरणाला सुरुवात केली.