रंग दे बसंती या चित्रपटात दिसलेला हा अभिनेता आहे अमिताभ बच्चन यांचा जावई

रंग दे बसंती या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप चांगला गल्ला जमवला होता. या चित्रपटाला अनेक पुरस्कार देखील मिळाले होते. या चित्रपटात आमिर खान, शर्मन जोशी, कुणाल कपूर, अतुल कुलकर्णी, आर. माधवन, सोहा अली खान यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटातील सगळ्याच कलाकारांच्या भूमिकांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती.

तुम्हाला माहीत आहे का, या चित्रपटातील एक अभिनेता अमिताभ बच्चन यांचा जावई आहे. अभिनेता कुणाल कपूरचे लग्न नैना बच्चनसोबत झाले आहे. नैना ही अभिनेते अमिताभ बच्चन यांची पुतणी आहे. अमिताभ यांचा सख्खा भाऊ अजिताभ यांची ती मुलगी असून कुणाल आणि नैनाचे लग्न २०१५ मध्ये झाले आहे. लग्नाच्या अनेक वर्षं आधीपासून ते दोघे एकमेकांना ओळखतात.

अनेक वर्षांच्या नात्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा विचार केला. कुणाल आणि नैनाचे लग्न धुमधडाक्यात झाले. या लग्नाला बच्चन कुटुंबियातील मंडळींसोबतच बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. कुणालने रंग दे बसंती या चित्रपटात अस्लम ही भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्याला फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट सहकलाकारासाठी नामांकन देखील मिळाले होते.

कुणालने मिनाक्षी या चित्रपटाद्वारे त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. रंग दे बसंती या चित्रपटामुळे त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली.लागा चुनरी में डाग, हॅट्रीक, वेलकम टू सज्जनपूर यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे. पण गेल्या काही वर्षांमध्ये तो खूपच कमी चित्रपटांमध्ये झळकतोय. आलिया भटच्या डिअर जिंदगी या चित्रपटात तो एका छोट्याशा भूमिकेत दिसला होता.

तो सध्या बॉलिवूडमध्ये खूपच कमी चित्रपटांमध्ये काम करत असला तरी तो दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करतो. कुणाल सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. तो त्याचे फोटो नेहमीच इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असतो. कुणाल आजही तितकाच हँडसम दिसतो.